शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

बालगोकुलम २०१६ -- पुणे

बालगोकुलम २०१६ -- पुणे 

             अक्षरभारती संस्था, पुणे या संस्थेचे वाचनालय आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चालवले जाते. दिनांक ०७/०१/२०१७ शनिवार रोजी या संस्थेचा वार्षिक वर्धापनदिन बालगोकुलम या नावाने इंजिनियरिंग कॉलेज ग्राउंड शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी पार पडला.
            या कार्यक्रमाला जिल्हाभरातून अनेक शाळा व अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या शाळेतील मुलांच्या दृष्टीने हा कार्यक्रम म्हणजे आनंदाची एक पर्वणी होती.
             शाळेतील शिक्षक मुलांना पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी घेऊन जावे कि नाही या द्विधा मनस्थितीत होते.परंतू शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र बोडके आणि शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष श्री. सुशांत काळे यांनी मुलांना नेणे व आणणे ही जबाबदारी उचलली आणि मुलांनी एक आगळावेगळा अनुभव घेतला. सुमारे १०८ वर्षांची परंपरा लाभलेल्या या भव्य वास्तूमध्ये विविध कार्यक्रमांचा आनंद मुलांनी लुटला.
           सकाळच्या सत्रात मुलांसाठी प्रश्न मंजुषा या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सर्व मुलांनी या उपक्रमात भाग घेतला. या वेळी शिक्षकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास या कार्यक्रमातून महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या. यानंतर मुलांसाठी विविध खेळांचे नियोजन केले होते. खेळाचा आनंद घेऊन मुलांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
          दुपारच्या सत्रात भव्य अशा सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या मुलांनी विविध देशभक्तीपर गीते, नृत्य व नाटिका सादर केल्या. 
           त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मान. श्री. राहुल सोलापूरकर उपस्थित होते. सर्व सभागृह त्यांच्या अमोघ वाणीतील भाषणाने भारावून गेले.
          या आनंदाची लयलूट मुले करत असतानाच एक घोषणा झाली---- विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारामळा या शाळेतील शिक्षिका श्रीमती. सरिता परदेशी यांनी आपले पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावर यावे. ही घोषणा ऐकताच मुलांनी केलेला जल्लोष केवळ अवर्णनीय होता.
         मान. श्री. राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते मुलांनी बक्षिस स्वीकारले. हा क्षण मुलांच्या दृष्टीने एक सोनेरी क्षण होता. 
           या वास्तूतील विविध रचना, सभागृहाची रचना, वेगवेगळे कक्ष, हा सर्व अनुभव मुलांना केवळ नवीनच नाही तार अविस्मरणीय होता. येताना सर्व मुलांना संस्थेकडून भेट म्हणून रोपे मिळाली. ही रोपे मुलांनी रुजवली,जगवली आणि वाढवली.या रोपांच्या रुपात या कार्यक्रमाची आठवण मुलांच्या दारात रुजली आहे.
                    सोनेरी आठवणीची रुपेरी छायाचित्रे 

















 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा