बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

आमची सहल ----- आगळीवेगळी नव्हे, अगदी वेगळी

आमची सहल ----- आगळीवेगळी नव्हे, अगदी वेगळी 

        सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा अभ्यास दौरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडी या ठिकाणी आयोजित केला होता. या दरम्यान झालेल्या चर्चेत शाळा व्यव-
-स्थापन समिती अध्यक्षांनी पालक विद्यार्थी एकत्रित सहलीबाबत सूचना मांडली आणि सर्वांनी या सूचनेला मान्यताही दिली.
         यातूनच शाळेने सर्वानुमते शिक्षक, पालक, व विद्यार्थी अशा सर्वांची सहल गणपतीपुळे व कोल्हापूर  येथे आयोजित केली.
         गणपतीपुळे येथील निळाशार, अथांग समुद्र पाहिल्यावर मनाबरोबरच पायांनीही समुद्राकडे धाव घेतली. सागराच्या प्रत्येक लाटेबरोबर मुलांच्या व पालकांच्या आनंदाला आलेले उधाण पाहून डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. आमच्या नकळत हे अश्रू समुद्राच्या पाण्यात मिसळून गेले. थेऊर केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. स्नेहलता शितोळे या प्रसंगाच्या साक्षीदार होत्या. हा आनंद, हा अनुभव प्रत्यक्ष अनुभवावा........ वर्णन करणे केवळ अशक्य.
                मालगुंड परिसरातील निसर्गरम्य वातावरणात संध्याकाळ घालवून आम्ही कोल्हापूर येथे मुक्काम केला. 
           दुसऱ्या दिवशीचे कोल्हापूर दर्शन अप्रतिम झाले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात महालक्ष्मी देवीचे दर्शन करून शाहू पॅलेस पाहिले. हा ऐतिहासिक वारसा पाहताना सर्वजण भान हरपून गेले.
           त्यांनतरचा टप्पा होता तो म्हणजे कणेरी मठ. ग्रामसंस्कृतीची ओळख सांगणारा. या ठिकाणच्या आरसे महालात बालचमू हरवून गेले. कणेरी मठातील प्रत्येक पुतळा कलाकाराच्या कलात्मकतेची साक्ष देत होता. प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवायलाच हवा असा हा संस्कृतीचा आरसा. सुमारे तीन तास फिरून संध्याकाळी ज्योतिबाला वंदन करून सर्वजण घरी परतले.
         शाळेतील केंद्रप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या परस्पर सहकार्य व एकजुटीमुळे सहल यशस्वी झाली. 

                            क्षणचित्रे