शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

सायकल रँली रविवार 20161210 172629

आमची सहल नोव्हेंबर २०१६

दहिहंडी, शाळा तारमळा 20161031 153743

सावित्रीबाई फुले जयंती --- बालिका दिन

 सावित्रीबाई फुले जयंती --- बालिका दिन  

              ०३ जानेवारी, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती. हा दिवस बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
               जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा या ठिकाणी बालिका दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व मुली सावित्रीच्या वेशात शाळेत आल्या.
                  सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन मुलींनी केले. या वेळी प्रभात फेरीचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले होते. मुलींनी या वेळी 
                         लेक वाचवा, लेक शिकवा.
                         मुलगी झाली, प्रगती झाली. 
            मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान.
                            बेटी बचाव, बेटी पढावो. 
                  मुलापेक्षा मुलगी बरी,प्रकाश देते दोन्ही घरी. 
              अशा स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या घोषणा दिल्या. या प्रसंगी 
कल्पना चावला,इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सिंधुताई सपकाळ, सरोजिनी नायडू, पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, यांसारख्या अनेक कर्तबगार 
महिलांविषयी माहिती सांगितली गेली.
            या कार्यक्रमाची दाखल स्थानिक बातमीदाराने घेतली. दिनांक ०४ 
जानेवारी या दिवशी केसरी वर्तमानपत्रात या सावित्रींच्या लेकींचा फोटो 
झळकला आणि या आनंदसोहळ्याचा समारोप झाला.
 
   ‌‍

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

स्वागत नववर्षाचे

 स्वागत नववर्षाचे

                      जानेवारी, ग्रेगरियन वर्षाचा पहिला महिना. ३१ डिसेंबरच्या रात्रीच हे स्वागत जगभर केले जाते. या स्वागताचा जल्लोष आणि आतषबाजी पाहायला अबालवृद्धांना भावते.
                       चैत्र शुद्ध प्रतिपदा, भारतीय सौर वर्षाचा पहिला दिवस. दारोदारी गुढ्या उभारून भारतीय या वर्षाचं स्वागत करतात.
                        चैत्र शुद्ध प्रतिपदेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तारमळा विविधरंगी गुढ्यांनी सजते. विविध सामाजिक संदेश या गुढ्या देतात. गुढीपाडवा साजरा करून आम्ही आपली परंपरा जपतो. परंपरा जपताना आम्ही आधुनिकतेची कासही सोडत नाही. म्हणूनच आमच्या शाळेत आम्ही नवीन वर्षाचे स्वागतही तितक्याच जल्लोषात केले. मुलांनी नववर्षाचे स्वागत केक कापून केले. शाळेने मुलांना अल्पोपहार देण्याचे नियोजन केले. चॉकलेट, केक, इडली-सांबार अशी धमाल पार्टी मुलांनी अनुभवली.




 











































































शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

एक कार्यक्रम -- एक शिकवण

 एक कार्यक्रम -- एक शिकवण 

              डिसेंबर महिना येतो तोच मुळी गुलाबी थंडी आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण घेऊन. दत्त जयंती, ईद ए मिलाद आणि ख्रिसमस हे तिन्ही सण या एकाच महिन्यात येतात. 
           डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जगभराला वेध लागतात ते नाताळ सणाचे आणि नववर्षाच्या स्वागताचे. 
           नाताळ सण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्याचा सण.
           या वर्षी थेऊर केंद्राच्या केंद्र प्रमुख सौ. स्नेहलता शितोळे यांच्या मार्गदर्शनाने हा सण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. 
           या नियोजनात यशवंतराव चव्हाण मेमोरिअल स्कूल या शाळेने सहकार्य केले. मुख्याध्यापक अडावतकर मॅडम, कुमुदिनी मॅडम, अविनाश सर,व शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
           अविनाश सरांनी मुलांना येशू जन्माची कथा, नाताळ सणाचे महत्त्व, सण साजरा करण्याची पद्धत याविषयी माहिती आपल्या ओघवत्या वाणीत सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 
           यानंतर आलेल्या सांताक्लॉजने मुलांना खाऊ वाटप केले. मुलं सांताक्लॉज बरोबर खेळण्यात दंग झाली. अतिशय आनंदात हा कार्यक्रम पार पडला. 
           या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.